भारत वि.ऑस्ट्रेलिया: कसोटीसाठी भारतीय संघातील १२ खेळाडूंची घोषणा

0

अॅडलेड-भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियात उद्यापासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होत आहे. तत्पूर्वी बीसीसीआयनेऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी अंतिम १२ खेळाडूंची घोषणा केली आहे. अॅडलेड येथे होणाऱ्या या सामन्यात भारताने रोहित शर्माच्या पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. पृथ्वी शॉ दुखापत ग्रस्त झाल्यामुळे लोकेश राहुल आणि मुरली विजय यांना सलामीला संधी मिळण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियानेही या सामन्यासाठी अंतिम अकरा खेळाडूंची नावे जाहिर केली आहेत.

मुंबईकर रोहितला इंग्लंड आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेत स्थान देण्यात आले नव्हते. मात्र, मर्यादित षटकांच्या सामन्यात रोहितने दमदार कामगिरी केली. त्यामुळे कसोटी संघातील त्याची दावेदारी मजबूत झाली आहे. त्यात लोकेश राहुलचा फॉर्म हा संघासाठी चिंतेची बाब बनला आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीत रोहित आणि मुरली विजय ही सलामीची जोडी पाहायला मिळेल. सलामीच्या जोडीत प्रयोग न करण्याचा निर्णय झाल्यास हनुमा विहारी आणि रोहित यांच्यापैकी एकाला अंतिम अकरामध्ये संधी दिली जाऊ शकते. गोलंदाजीत मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमरा यांच्यावर धुरा असेल. आर. अश्विनवर फिरकीची मदार असणार आहे.

ऑस्ट्रेलियाचा मार्कस हॅरिसचे या कसोटीत पदार्पण होणार असून तो सलामीला उतरणार आहे. उस्मान ख्वाजा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येणार आहे. या संघात उपकर्णधार मिचेल मार्शला वगळण्यात आले आहे.

असे आहेत दोन्ही संघ
भारत: विराट कोहली, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमरा.

ऑस्ट्रेलियाः मार्कस हॅरिस, अॅरोन फिंच, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हॅण्ड्सकोम्ब, ट्रॅव्हीस हेड, टीम पेन, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड.