प्रदूषित वातावरणात आज भारतीय संघ बांगलादेशशी भिडणार !

0

नवी दिल्ली: दिल्ली शहर प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. श्वास घेणे दिल्लीकरांना अवघड झाले आहे. दरम्यान त्यातच भारत आणि बांगलादेश संघात मालिकेतील पहिली टी-२० क्रिकेट लढत आज रविवारपासून रंगणार आहे. पहिला सामना आज होत आहे. प्रदूषित वातावरणातच हा सामना होत आहे. त्यामुळे खेळाडूंना अडचण येणार आहे.

घरच्या मैदानावर खेळताना भारताचेच पारडे जड असणार आहे. मात्र या लढतीवर प्रदूषणाचे मोठे सावट असणार आहे. अरुण जेटली स्टेडियम दिल्ली येथे सायंकाळी ७ वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.

विराट कोहलीने विश्रांती घेतल्यानंतर भारतीय संघाची सूत्रे रोहित शर्माकडे आली आहेत. शिखर धवन पुन्हा संघात परतला आहे. विजय हजारे करंडकमध्ये तो धावांसाठी संघर्ष करताना दिसून आला. त्याला सात सामन्यांत केवळ एकच अर्धशतक ठोकता आले. मधल्या फळीत लोकेश राहुल, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, कृणाल पंड्या असणार आहेत. त्याचबरोबर अष्टपैलू शिवम दुबे याला पदार्पणाची संधी असल्याचे संकेत कर्णधार रोहित शर्माने दिले आहेत. शिवमच्या समावेशाने मनीष पांडे आणि संजू सॅमसन यांना बाहेर बसावे लागू शकते. खलील अहमद, युजवेंद्र चहल, दीपक चहर, राहुल चहर, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर यांची आपापसातच स्पर्धा असेल. म्हणूनच अंतिम अकरा जणांचा संघ निवडताना संघव्यवस्थापनाचा चांगली कसरत करावी लागणार आहे. विशेष म्हणजे आगामी टी-२० वर्ल्ड कपच्या दृष्टीने संघातील प्रत्येक जण आपली छाप पाडण्यासाठी उत्सुक आहे. युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्याचे धोरण संघाने अवलंबिले आहे.

बांगलादेश संघासाठी ही तीन सामन्यांची मालिका आपला आत्मविश्वास उंचाविण्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. सप्टेंबरमध्ये अफगाणिस्तानने चितगावमध्ये बांगलादेशला कसोटीत नमविले. त्यातच भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी बुकीने केलेल्या संपर्काबद्दल आयसीसीला कळविण्यास कसूर केल्याबद्दल शाकीब अल हसनवर दोन वर्षांची बंदी घातली आहे. संघाची सूत्रे महमुदुल्लाह रियाद याच्याकडे सोपविण्यात आली आहेत. तेव्हा अशा स्थितीत बांगलादेश संघ भारताला कसा लढा देतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.