लंडन-लोकेश राहुलच्या नाबाद १०१ धावा आणि त्याला रोहित शर्मा-विराट कोहली या जोडीने केलेली भागीदारीच्या जोरावर भारताने पहिल्या टी-२० सामन्यात इंग्लंडवर ८ गडी राखून मात केली आहे. या विजयासह भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडने विजयासाठी दिलेले १६० धावांचे आव्हान भारताने रोहित शर्मा आणि लोकेश राहुलच्या शतकी भागीदारीच्या जोरावर सहज पूर्ण केले.
शिखर धवन लवकर बाद झाल्याने भारताच्या डावाची सुरुवात खराब झाली होती. मात्र त्यानंतर रोहित आणि लोकेश राहुलने संघाचा डाव सावरला. विशेषकरुन लोकेश राहुलने आक्रमक खेळी करुन इंग्लंडच्या गोलंदाजीवर आक्रमण चढवले. रोहित शर्माला फॉर्मात येण्यासाठी थोडासा अवधी लागला, मात्र तोपर्यंत लोकेश राहुलने सर्व कसर भरून काढली. रोहित माघारी परतल्यानंतर राहुलने विराटच्या साथीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
इंग्लंडकडून डेव्हिड विली आणि आदिल रशिद यांना प्रत्येकी १-१ बळी घेता आला. याव्यतिरीक्त अन्य सर्व गोलंदाजांची भारतीय फलंदाजांनी चांगलीच धुलाई केली. तत्पूर्वी कुलदीप यादवच्या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजीच्या जोरावर भारताने मोठी धावसंख्या उभारु पाहणाऱ्या यजमान इंग्लंडला १५९ धावांवर रोखले. कुलदीप यादवने घेतलेले ५ बळी हे पहिल्या डावाचे वैशिष्ट्य ठरले. कुलदीपने इंग्लंडची मधळी फळी कापून काढत भारताला सामन्यात पुनरागमन करण्यास मदत केली. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारतीय गोलंदाजांना पहिल्या षटकात जेसन रॉय, जोस बटलर जोडीच्या आक्रमक फटकेबाजीचा सामना करावा लागला. मात्र जेसन रॉयला उमेश यादवने आपल्या गोलंदाजीवर माघारी धाडले. यानंतर इंग्लंडचा एकही फलंदाज कुलदीपच्या गोलंदाजीपुढे तग धरु शकला नाही.