अखेर ठरले; भारतीय संघ न्यूझीलंडशी खेळणार सेमीफायनल

0

नवी दिल्ली: भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता भारताची लढत न्यूझीलंडशी होणार आहे. मंगळवारी ९ जुलै रोजी हा सामना होणार आहे. विश्वचषक स्पर्धेच्या अखेरच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यामुळे उपांत्य फेरीतील लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यानुसार, गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असलेल्या भारतीय संघाचा सामना चौथ्या क्रमांकावरील न्यूझीलंडशी होणार आहे. तर, क्रमांक दोनवर असलेला ऑस्ट्रेलिया संघ तिसऱ्या क्रमांकावरील इंग्लंडशी भिडणार आहे.

भारताने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात काल शनिवारी श्रीलंकेचा ७ गडी राखून दणदणीत पराभव केला. याविजयाने गुणतालिकेत भारत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारताचे एकूण १५ गुण झाले आहेत, तर ऑस्ट्रेलिया १४ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे इंग्लंडच्या खात्यात १२ गुण आहेत तर न्यूझीलंड ११ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. आता या चार संघात अंतिम फेरीसाठी लढत होणार आहे. यातील पहिला सामना भारत आणि न्यूझीलंडमध्ये ९ जुलै रोजी मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात होणार आहे. तर, दुसरा सामना इंग्लंड व ऑस्ट्रेलियामध्ये ११ जुलैला बर्मिंगममध्ये खेळला जाईल. ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत ९ पैकी सात सामने जिंकले आहेत. दोन सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर, यजमान इंग्लंडनं ९ पैकी सहा सामन्यात विजय मिळवला आहे.