मँचेस्टर : काल भारत वि. न्यूझीलंड असा उपांत्य सामना रंगला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंड संघाला भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत धावांवर अंकुश ठेवला. न्यूझीलंडला 46.1 षटकांत 5 बाद 211 धावा करता आल्या आणि त्यानंतर पावसाचे आगमन झाले. त्यामुळे हा सामना राखीव दिवशी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पावसामुळे उपांत्य फेरीचा सामन्याचा खेळ वाया गेल्याने निराश झालेल्या चाहत्यांना आज सामना होण्याची अपेक्षा आहे. आयसीसीच्या नियमानुसार आज सामना 46.1 षटकापासूनच पुढे सुरू होईल. त्यामुळे उर्वरित 23 चेंडूंत किवी किती धावा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाच्या तुरळक सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आजच्या हवामानाच्या अंदाजानुसार ओल्ड ट्रॅफर्डवर पाऊस पडण्याची शक्यता 0 ते 10 टक्केच आहे. ढगाळ वातावरण असेल, परंतु अधुनमधून सूर्याची कृपा होईल. त्यामुळे हा सामना तेथील वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता ( भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता) सुरू होईल. सुरुवातीचे दोन तास लख्ख सुर्यप्रकाश असेल आणि त्यामुळे ग्राऊंड्समनला मैदान सुकवण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.