धर्मशाला: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी-२० सामना आज रविवारी धरमशाला येथील स्टेडियमवर होत आहे. मात्र या सामन्यावर पावसाचे सावट आहे. धरमशालात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा मुक्काम असून आज दुपारीही पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सामन्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर सायंकाळी ७ वाजल्यापासून सामना सुरू होणार आहे. सामन्याआधी पाऊस पूर्णपणे थांबल्यास पूर्ण ४० षटकांचा खेळ होईल, असे सांगण्यात येत आहे. या मैदानावर पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था चांगली आहे. त्यामुळे पावसाने काही तास उसंत घेतल्यास कमी षटकांचा सामना होऊ शकतो, अशी आशा आहे. तशीच वेळ आल्यास ५-५ षटकांचाही सामना होईल असेही बोलले जात आहे.