मुंबई : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटीत दहा विकेट घेत दमदार कामगिरी करणाऱ्या जलदगती गोलंदाज उमेश यादवचा वन डे मालिकेत संघात समावेश करण्यात आला आहे. जलदगती गोलंदाज शार्दूल ठाकूरला दुखापतीमुळे विंडीजविरुद्धच्या पहिल्या दोन वन डे सामन्यांतून माघार घ्यावी लागली आहे. त्याच्या जागी उमेश यादवला संधी देण्यात आली आहे.
विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत शार्दूलला पदार्पणाची संधी मिळाली, परंतु दहा चेंडू टाकल्यानंतर त्याच्या स्नायूत दुखापत झाली. त्यानंतर त्याला मैदान सोडावे लागले. उमेश इंग्लंड दौऱ्यातील वन डे मालिकेत खेळला होता, परंतु त्याला आशिया चषक स्पर्धेतून वगळण्यात आले होते. त्यानंतर विंडीजविरुद्धच्या पहिल्या दोन वन डे सामन्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या संघातही त्याचा समावेश नव्हता. मात्र, शार्दूलच्या दुखापतीमुळे त्याला संधी मिळाली. उमेशसह भारतीय संघात खलील अहमद आणि मोहम्मद शमी हे जलदगती गोलंदाज आहेत.
असा आहे भारतीय संघ :
विराट कोहली ( कर्णधार), रोहित शर्मा ( उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, अंबाती रायुडू, मनिष पांडे. महेंद्रसिंग धोनी ( यष्टिरक्षक), रिषभ पंत, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, खलील अहमद, उमेश यादव.