मँचेस्टर : विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने आजपर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आतापर्यंत एकही सामने भारतीय संघाने गमविले नाही. पाच सामन्यांत चार सामन्यात विजय मिळवून भारताने उपांत्य फेरीच्या दिशेने आगेकूच केली आहे. आज गुरुवारी २७ रोजी मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्डवर भारतीय संघाचा वेस्ट इंडिजशी सामना आहे. भारताचा हा विजयी रथ इंडीज संघाला रोखता येणार का? हे पाहावे लागेल.
वेस्ट इंडिजला सहा सामन्यांत फक्त एकच विजय मिळवता आला असून चार पराभव आणि एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या गेल्या सामन्यात कालरेस ब्रेथवेटने वेस्ट इंडिजला अनपेक्षित असा विजय मिळवून देण्याकडे कूच केली होती. मात्र षटकारांची आतषबाजी करणाऱ्या ब्रेथवेटची शतकी झुंज अखेर पाच धावांनी व्यर्थ ठरली होती. मैदानात चमकदार कामगिरी करूनही जेसन होल्डरच्या नेतृत्वाखालील विंडीज संघ थोडय़ा फरकाने अपयशी ठरत आहे. त्यातच यंदाची ‘आयपीएल’ गाजवणारा आंद्रे रसेल गुडघ्याच्या दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर फेकला गेला असून त्याची उणीव कॅरेबियन संघाला नक्कीच जाणवणार आहे.