वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी आज भारतीय संघाची निवड

0

नवी दिल्ली: ३ ऑगस्टपासून भारताचा वेस्ट इंडीजशी सामना आहे. भारतीय संघाची आज रविवारी 21 रोजी निवड करण्यात येणार आहे. एम. एस. के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय वरिष्ठ निवड समितीच्या मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये आयोजित बैठकीत ही निवड करण्यात येणार आहे. या बैठकीनंतर दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पत्रकार परिषदेत नव्या संघाची घोषणा होईल. माजी कर्णधार धोनी विंडीज दौऱ्यात नसेल हे स्पष्ट झाले आहे. कर्णधार विराट कोहलीने मात्र आपण विश्रांती घेणार नसल्याचे म्हटले आहे.

धोनी विश्रांती घेत असताना यष्टीरक्षणाचा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. ऋषभ पंत वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाईल हे जवळजवळ निश्चित मानले जात आहे. परंतु, दुसऱ्या यष्टीरक्षकासाठी २-३ नावांची चर्चा होऊ शकते. यात संजू सॅमसन आणि ईशान किशन यांच्या नावांचा समावेश आहे. विंडीज दौऱ्याच्या वेळी जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. यामुळे निवड समितीला नव्या चेहऱ्यांचा विचार करावा लागणार आहे. नव्या गोलंदाजांच्या यादीत नवदीप सैनीचे नाव प्रमुख आहे. हा वर्ल्डकपमध्ये राखीव खेळाडू होता. खलील अहमद, आवेश खान, दीपक चहर यांना वेस्ट इंडीजचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

नव्या संघात फलंदाज मयंक अग्रवालच्या समावेशाची दाट शक्यता आहे. रोहित शर्माला या वेळी विश्रांती दिली जाईल का, हेही पहावे लागणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यासाठी गेलेल्या शुभमन गिल यांचे स्थानही पक्के समजले जात आहे. केदार जाधव आणि दिनेश कार्तिक संघाबाहेर जाणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. या दोघांमध्ये विजय शंकरचेही नाव चर्चेत आहे. विजय शंकर वर्ल्डकपमध्ये जायबंदी झाला होता.