भारतीय संघाकडून आफ्रिकन संघ नेस्तनाबूत; ३.० ने ‘व्हाइटवॉश’ देत रचला इतिहास !

0

रांची: भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आफ्रिकन संघाला पूर्णपणे नेस्तनाबूत करत ‘व्हाइटवॉश’ दिला. तिसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ४९७ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा पहिला डाव १६२ धावांवर तर फॉलो-ऑन नंतरचा डाव १३३ धावांवर आटोपला. त्यामुळे एक डाव आणि २०२ धावांनी विजय मिळवत भारताने मालिका ३-० ने जिंकली. या विजयासह भारतीय संघाने तब्बल 84 वर्षांपूर्वीचा एक विक्रम मोडीत काढला आहे.

यापूर्वी भारताने एका मालिकेत कोणत्याही संघाला तब्बल दोनदा फॉलोऑन देऊन मोठे विजय मिळवलेले नाहीत. त्याचबरोबर आतापर्यंत एका मालिकेत दोन किंवा त्यांच्यापेक्षा जास्तवेळा दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन देण्याची तब्बल 84 वर्षांनंतर पुनरावृत्ती झाली आहे.

या विजयासह भारताचा कर्णधार विराट कोहलीने देखील एक इतिहास रचला आहे. आपल्याच मातीमध्ये भारताच्या कर्णधाराला विराटसारखी कामगिरी करता आलेली नाही. कोहलीने आपल्याच मैदानात तब्बल तीनवेळा प्रतिस्पर्ध्यांना व्हाइट वॉश देण्याची किमया साधली आहे. यापूर्वी भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दिनने दोन वेळा दोन कसोटी मालिकांमध्ये निर्भेळ यश संपादन केले होते.