दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताची ऐतिहासिक मालिका विजय !

0

पुणे: भारत आणि दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या तीन कसोटी सामन्यापैकी आज भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवीत कसोटी मालिका खिशात घातली आहे. भारताच्या पहिल्या डावातील 601 धावांचा पाठलाग करण्यात दक्षिण आफ्रिकेला दोन्ही डावांत अपयश आले. आफ्रिकेचा पहिला डाव 275 धावांत गुंडाळल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने पाहुण्यांवर फॉलोऑन लादला. दुसऱ्या डावातही आफ्रिकेच्या फलंदाजांची हाराकिरी सुरूच राहिली आणि भारताने हा सामना एक डाव व 137 धावांनी जिंकला. या कामगिरीसह भारतीय संघाने घरच्या मैदानावर विक्रमाची नोंद केली.

मायदेशात सलग 11 कसोटी मालिका जिंकणारा भारत हा पहिलाच संघ ठरला. 2013पासून भारताने मायदेशात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 10 मालिका विजयाचा विक्रम मोडला.

मयांक अग्रवाल ( 108), विराट कोहली ( 254*), चेतेश्वर पुजारा ( 58), अजिंक्य रहाणे ( 59) आणि रवींद्र जडेजा ( 91) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने पहिला डाव 5 बाद 601 धावांवर घोषित केला. त्यानंतर आर अश्विन ( 4/69), उमेश यादव ( 3/37) आणि मोहम्मद शमी ( 2/44) यांच्या गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 275 धावांत गडगडला. कर्णधार कोहलीनं चौथ्या दिवशी आफ्रिकेला फॉलोऑन दिला. इशांत शर्मानं पहिल्याच षटकात आफ्रिकेला धक्का दिला. त्यानंतर आर अश्विन आणि उमेश यादव यांनी अनुक्रमे दोन व एक विकेट घेत उपहारापर्यंत आफ्रिकेची अवस्था 4 बाद 74 अशी केली होती.