नवी दिल्ली:बर्फाळ प्रदेशातील हिममानवाविषयी आपण नेहमीच चर्चा ऐकतो. याविषयीच्या कथाही रंगवून सांगितल्या जातात. मात्र, आता हिमालयातील बर्फाळ प्रदेशात हिममानवाच्या पावलाचे ठसे आढळले असल्याचा दावा भारतीय सैन्य दलाने केला आहे. याबाबत ट्विटरद्वारे फोटो प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामुळे हिममानवाच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे.
भारतीय सैन्याच्या पथकाला ९ एप्रिल रोजी मकालू बेस कॅम्प येथे रहस्यमय पावलांचे ठसे आढळले. नेपाळ- चीन सीमेजवळचा हा परिसर आहे. हे ठसे मानवी पावलासारखे दिसत असले तरी त्यांचा आकार ३२ X १५ इंच इतका होता. या भागातील कोणत्याही प्राण्याच्या पावलांचे ठसे इतके मोठे नसल्याने सैन्याचे पथकही संभ्रमात पडले होते. मात्र, हे ठसे फक्त एकाच पायाचे आहेत. हे हिममानवाच्या पावलांचे ठसे असल्याची शक्यता सैन्याने वर्तवली आहे. मकालू- बारुन या भागात यापूर्वीही हिममानव दिसल्याचा दावा करण्यात आला होता. हिमालयातील हिममानव अर्थात यतीविषयीच्या अनेक सुरस कथाही प्रसिद्ध आहे. हिमालयातील तिबेट आणि नेपाळ या भागातील शेर्पांकडून याविषयीचे किस्सेही सांगितले जातात.