मुंबई: भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांना कायम ठेऊन दोन वर्षांसाठी त्यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य कपिल देव यांनी शास्त्री यांच्या नावाची आज घोषणा केली. माजी क्रिकेटपटू कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांच्या त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीने पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली.
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत रवी शास्त्रींसह अनेकजण होते. त्यांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या. या शर्यतीत न्यूझीलंडचा क्रिकेटपटू माइक हेसन दुसर्या क्रमांकावर होता. तर ऑस्ट्रेलियाचा टॉम मुडी तिसर्या क्रमांकावर होता. समितीतील तिन्ही सदस्यांनी प्रशिक्षकपदाच्या स्पर्धेतील प्रत्येक उमेदवारांना वेगवेगळे गुण दिले होते. त्यात शास्त्रींच्या पारड्यात सर्वाधिक गुण पडल्याने टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी त्यांचीच निवड करण्यात आली असल्याचं सल्लागार समितीचे सदस्य कपिल देव यांनी सांगितले. रवी शास्त्री हे जुलै 2017 पासून टीम इंडियाचे प्रशिक्षक आहेत. त्यांच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात टीम इंडियाने आतापर्यंत 13 कसोटी सामने जिंकले आहेत. तर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 36 पैकी 25 सामने जिंकले आहेत. तर एकदिवसीय मालिकेत 60 पैकी 43 सामने जिंकले आहेत.