अभिमानास्पद: ब्रिटनच्या गृमंत्रीपदी भारतीय कन्या !

0

ब्रिटन:ब्रिटनचे माजी परराष्ट्र मंत्री बोरिस जॉन्सन यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे. माजी पंतप्रधान थेरेसा मे यांनी राजीनामा दिल्यानंतर बोरिस जॉन्सन हे पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. बोरिस यांच्या मंत्रीमंडळाचीही घोषणा झाली असून त्यामध्ये एका भारतीय वंशाच्या महिलेचा समावेश आहे. गुजरातमधील प्रीती पटेल यांची गृहमंत्री पदावर नियुक्त करण्यात आली आहे. गृहमंत्रीपदी विराजमान होणाऱ्या पटेल या भारतीय वंशाच्या पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत.

ब्रेग्झिटवरुन ब्रिटन सरकारवर उघडपणे टिका करणाऱ्या पटेल या बोरिस यांच्या समर्थक आहेत. पटेल या कंझर्वेटीव्ह पक्षाच्या ‘बॅक बोरिस’ मोहिमेच्या प्रमुख सदस्यांपैकी एक होत्या. बोरिस यांना पाठिंबा देणाऱ्या पटेल यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता सुरुवातीपासूनच व्यक्त केली जात होती. ‘नवे मंत्रीमंडळ हे आधुनिक ब्रिटन आणि कंझर्वेटीव्ह पक्षाच्या आधुनिक धोरणांचा पुरस्कार करणारे असावे,’ असं मत पटेल यांनी मंत्रिमंडळाची घोषणा होण्याच्या काही तास आधी केली होती. मूळच्या गुजराती असणाऱ्या पटेल या ब्रिटनमधील भारतीयांमध्ये लोकप्रिय आहेत. भारतीयांनी आयोजित केलेल्या अनेक कार्यक्रमांना पटेल आवर्जून उपस्थित राहतात. पटेल या भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मोठ्या समर्थक आहेत.