भारत सरकारच्या १२ हजार वेबसाइट हॅकर्सच्या निशाण्यावर? केंद्र सरकारने जारी केला अलर्ट

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (१४C) ने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सरकारांना महत्वाचा अलर्ट जारी केला आहे. इंडोनेशियामधील काही हॅकर ग्रुप भारतामधील जवळजवळ १२ हजार सरकारी वेबसाईट्सवर सायबर हल्ला करण्याचा प्लॅन आखत आहे, अशी माहीती आहे.

देशातील सर्वच्या सर्व राज्य आणि केंद्र सरकारकडून चालवली जाणारी अनेक संकेतस्थळे हॅकर्सकडून टार्गेट केली जात आहेत. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी आता प्रतिबंधात्मक पावले उचलावीत म्हणून सूचना देण्यात आल्या आहेत. या काळात कोणत्याही संकेतस्थळावर हल्ला होणार नाही, यासाठी दक्ष राहण्यास सांगण्यात आले आहे.
गेल्या वर्षभरात एकूण १९ वेळा भारताच्या सरकारी संकेतस्थळांवर सायबर हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे आताच्या माहीतीनुसार, संबंधित सरकारी संकेतस्थळांवर अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व राज्य आणि केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर तांत्रिक लक्ष ठेवण्याच्या सूचना इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरने दिल्या आहेत.
तसेच अनोळखी क्रमांक किंवा ईमेलमधून आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक न करण्याचे सरकारी कर्मचाऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे. अशा लिंकवर क्लिक केल्यास सायबर हल्ला होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे संवेदनशील संकेतस्थळाची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. तसंच, सर्व सॉफ्टवेअरचे अद्ययावतीकरण सुरू आहे, अशी माहिती सायबर सुरक्षा पुरवणाऱ्या पिंगसेफ कंपनीचे संस्थापक आनंद प्रकाश यांनी दिली आहे.