ग्रामीण डाक सेवक संघटनेचे २२ मेपासून देशव्यापी संप

0

पिंपरी :- ग्रामीण डाक सेवक संघटना मंगळवार (दि. 22) पासून बेमुदत संपावर जाणार आहे. डाक विभाग विभागीय कर्मचारी आणि खातेबाह्य कर्मचारी यांच्यामध्ये करत असलेल्या दुजाभाव धोरणाविरोधात हा संप असणार आहे. हा संप देशव्यापी असून यामध्ये संपूर्ण देशभरातून दोन लाख 70 हजार खातेबाह्य कर्मचारी सहभागी होणार आहेत.

डाक खात्याला सुरु होऊन 150 वर्ष पूर्ण झाली असून एवढ्या प्रदीर्घ कालावधीनंतर देखील ग्रामीण भागातील डाक कर्मचा-यांना विभागीय कर्मचारी म्हणून निवडण्यात आले नाही. ग्रामीण भागातील प्रत्येक खातेबाह्य कर्मचारी खात्यांर्गत निवड होण्याची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. सध्या जे कर्मचारी खातेबाह्य आहेत, ते करीत असलेल्या प्रामाणिक कामामुळेच डाक खाते जोमात सुरु आहे, असे पुणे ग्रामीण डाक विभागाचे विभागीय सचिव एक नाथ मंडलिक यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

कोणताही आयोग लागू होताना विभागीय कर्मचा-यांसाठी वेगळी समिती व खातेबाह्य कर्मचा-यांसाठी वेगळी समिती नेमण्यात येते. विभागीय कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू होऊन 29 महिने झाले. पण खातेबाह्य कर्मचा-यांना वेतन आयोग लागू करण्यासंदर्भातली फाईल मात्र मंत्रालयात धूळ खात पडली आहे. कार्यालयीन कामकाजाची वेळ पाच तासांची पण प्रत्यक्षात काम आठ तास करून घेतले जाते. पगार मात्र पाच तासांचाच दिला जातो. खातेबाह्य कर्मचा-यांना पेन्शन सुविधा नाही. त्यामुळे वेतन आयोग लागू करावा, जेवढे काम तेवढा पगार द्यावा. पेन्शन सुविधा सुरु करावी. खातेबाह्य कर्मचा-यांचा खात्यात समावेश करून घ्यावा. अशा विविध मागण्यांसंदर्भात मंगळवार (दि. 22) पासून बेमुदत संप करण्यात येणार असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.