बीसीसीआयचा मोठा निर्णय; भारतीय संघ पाकमध्ये खेळायला पाठवणार नाही

0

नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये ६ ते १५ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या 23 वर्षांखालील Emerging Nations Cup क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ न पाठवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. दहा वर्षांनंतर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा आयोजन करण्याची संधी मिळणार आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास मनाई केल्याने पाकिस्तानला हा दणका बसला आहे.

२००९ मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर आलेल्या श्रीलंका संघाच्या बसवर दहशतवाद्यांनी बेछुट गोळीबार केला होता. त्यानंतर पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळवण्यात आलेला नाही. भारतीय संघ सर्व सामने श्रीलंकेत खेळेल आणि अंतिम सामनाही येथेच होणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका यांना स्पर्धेचे संयुक्त यजमानपद देण्यात आले आहे.

कराचीत बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती, हाँगकाँग आणि पाकिस्तान यांचे सामने होणार आहेत, तर कोलंबो येथे श्रीलंका, भारत, अफगाणिस्तान आणि ओमान यांच्यात लढती होतील. कोणत्याही अटींवर भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवणार नसल्याचा पवित्रा बीसीसीआयने घेतला आहे.

पाकिस्तानातील सर्व सामने नॅशनल स्टेडियममध्ये होणार असून त्यासाठी सर्व सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आल्याचे पीसीबीने सांगितले. सुरक्षेच्या कारणावरूनच अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी पाकिस्तानात खेळण्यास मनाई केली आहे. त्यामुळे स्पर्धा पाकिस्तानला त्या सर्व खेळाडूंचा विश्वास जिंकण्याची संधी असल्याचे बोलले जात आहे. २००९ च्या हल्ल्यानंतर पाकिस्तान संघाचे सर्व सामने संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यात येत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते आणि पाकिस्तानला सपाटून मार खावा लागला होता. Emerging Nations Cup मध्ये भारताचा पहिला सामना अफगाणिस्तानशी ७ डिसेंबरला होणार आहे. त्यानंतर ओमान ८ डिसेंबर आणि श्रीलंका १० डिसेंबर यांच्याशी भारताचा सामना होईल.