सिडनी- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियात झालेल्या चार कसोटी मालिकेवर भारताने कब्जा केला आहे. भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत कसोटी मालिकेत पराभूत केले आहे. आज पाचवा दिवसही पावसामुळे वाया गेल्यामुळे चौथी कसोटी अनिर्णीत राहिली आणि भारताने २-१ अशा फरकाने मालिका जिंकली. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इतिहास घडविला. ऑस्ट्रेलियात ७२ वर्षात भारताला प्रथमच मालिका विजय मिळविता आला आहे. ७२ वर्षात ११ कसोटी मालिका भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळले आहे.
भारतीय संघाने ॲडलेड व मेलबर्न कसोटी जिंकून मालिकेत आघाडी घेतली होती. त्यामुळे विजय मिळवून बरोबरी करण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाची धडपड सुरु होती. भारताने पहिल्या डावातच ६२२ धावांचा डोंगर उभा केला. चेतेश्वर पुजारा (१९३) आणि रिषभ पंत (नाबाद १५९) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने पहिला डाव ७ बाद ६२२ धावांवर घोषित केला.
ऑस्टेलियाचा पहिला डाव ३०० धावांवर गडगडला. कुलदीप यादवने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. भारताने ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन देत आपला मालिका विजय पक्का केला. चौथ्या दिवशी बिनबाद ६ धावांवर असताना खेळ थांबला. सोमवारी पाऊस कायम राहिल्याने खेळ झाला नाही.
भारतीय संघ १९४७ मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळला होता. त्यानंतर आतापर्यंत ११ मालिकेत भारताला विजय मिळवता आले नाही. त्यापैकी ३ मालिका भारताने बरोबरीत सोडवल्या, तर ८ मालिकांत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला.