विराट कोहलीच्या नेतृत्त्वात भारताचा मोठा विजय; वेस्ट इंडीजला नमवले

0

अँटिग्वा : भारत आणि वेस्ट इंडीज संघात पहिली कसोटी सामना खेळला गेला. यात भारतीय संघाने यजमान वेस्ट इंडिजला धूळ चारत पहिली कसोटी खिशात घातली आहे. 318 धावांनी विजय मिळवून कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी भारतीय संघाने घेतली. भारताच्या 419 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजचा संपूर्ण संघ 100 धावांत माघारी परतला. जसप्रीत बुमराहचा भेदक मारा आणि अजिंक्य रहाणेची दमदार खेळी याला या विजयाचे श्रेय जाते. या निकालासह भारताने परदेशातील सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली. यापूर्वी 2017मध्ये गॅले कसोटीत भारताने श्रीलंकेवर 304 धावांनी मात केली होती. विशेष म्हणजे भारताने कसोटी क्रिकेटमध्ये मिळवलेल्या सर्वात मोठ्या ( धावांच्या फरकाने) अव्वल पाचपैकी चार विजय हे विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली मिळवले आहेत.

जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर वेस्ट इंडिजच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. अजिंक्य रहाणेची (102) शतकी खेळी आणि हनुमा विहारी (93) व कर्णधार विराट कोहली ( 51) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने 419 धावांचे आव्हान उभे केले. 420 धावांचे लक्ष्य पाहूनच वेस्ट इंडिज संघाचे धाबे दणाणले होते, त्या बुमराहने त्यांना हतबल केले. बुमराहने अवघ्या 7 धावा देत विंडीजचा निम्मा संघ माघारी पाठवला. त्यानंतर इशांत शर्मा व मोहम्मद शमी यांनी विंडीजचा डाव 100 धावांत गुंडाळण्यात हातभार लावला. भारताने 318 धावांनी हा सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.