भारतीय महिला संघाच्या कर्णधारपदी हरमनप्रीत कौर !

0

नवी दिल्ली-आयसीसी महिला विश्व टी-२० संघाच्या कर्णधारपदी भारताच्या हरमनप्रीत कौरची निवड झाली आहे. काल आयसीसीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली. महिला टी२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभव झाला होता. विश्व महिला टी-२० संघात तीन भारतीय खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. यामध्ये हरमनप्रीत कौर, स्मृती मंधना पूनम यादव यांचा समावेश आहे. सलामीवीर म्हणून स्मृती मंधनाची निवड झाली आहे. तर फिरकी गोलंदाज म्हणून पूनम यादवचा समावेश करण्यात आला आहे.

वर्ल्डकपमधील कामगिरीच्या आधारावर अंतिम १२ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. आयसीसीच्या या संघात इंग्लंड आणि भारतीय संघाच्या प्रत्येकी तीन खेळाडूंचा समावेश आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या दोन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. पाकिस्तान, न्यूझीलंड, विडींज आणि बांगलादेशच्या प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश आहे. बांगलादेशच्या खेळाडूला १२ वा खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले आहे.

रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने इंग्लंड संघाचा पराभव करत चौथ्यांदा टी-२० वर्ल्डकपवर नाव कोरले. दुसरीकडे उपांत्य सामन्यात अनुभवी मिताली राजला भारतीय संघामध्ये अंतिम ११ मध्ये स्थान न दिल्यामुळे हरमनप्रीत कौर चर्चेत आहे. मिताली राजला महत्वाच्या सामन्यात संघामध्ये स्थान न दिल्यामुळे हरमनप्रीतवर टीका होत आहे.

या आहेत आयसीसीचा विश्व महिला टी-२० संघाच्या कर्णधार
हरमनप्रीत कौर (भारत, कर्णधार), एलिसा हेली (आस्ट्रेलिया), स्मृती मंदाना (भारत), एमी जोन्स (इंग्लंड, यष्टीरक्षक), डियांड्रा डोटिन (विंडीज), जोविरया खान (पाकिस्तान), एलिसा पेरी (आस्ट्रेलिया), लेग कास्पेरेक (न्यूजीलंड), आन्या श्रबसोले (इंग्लंड), क्रिस्टी गोर्डन (इंग्लंड), पूनम यादव (भारत), जहनारा आलम (बांग्लादेश).