मिताली राजची कमतरता भासलीच; भारतीय महिला संघाचा पराभव

0

वेलिंग्टन- भारत विरुद्ध न्यूझीलंड महिला क्रिकेट संघात आज पहिला २०-२० सामना झाला यात. स्मृती मानधना व जेमिमा रॉड्रीग्ज यांच्या दमदार खेळीनंतरही भारतीय महिला संघाला पराभव पत्करावा लागला. अनुभवी मिताली राजला न खेळवण्याचा डाव पुन्हा एकदा फसला. तिच्या गैरहजेरीत भारतीय फलंदाजी पुन्हा एकदा कमकुवत दिसली आणि संघाला २३ धावांनी हार मानावी लागली. न्यूझीलंडने विजयासाठी ठेवलेल्या १६० धावांच्या लक्षाचा पाठलाग करतांना भारतीय संघ १३६ धावांवर बाद झाला.

भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडची स्फोटक फलंदाज सूजी बेट्सला (७) लगेच माघारी पाठवून भारताने मोठे यश मिळवले, परंतु सोफी डेव्हिनने एका बाजूने जोरदार फटकेबाजी सुरू ठेवली. तिने ४८ चेंडूंत ६२ धावा केल्या. तिला अॅमी सॅटरवेट (३३) आणि कॅटी मार्टिन (नाबाद २७) यांनी योग्य साथ दिली. त्यांच्या फटकेबाजीच्या जोरावर न्यूझीलंडने २० षटकांत ४ बाद १५९ धावा केल्या.