कोरोनाची पुन्हा उसळी; ६७ लाखांचा टप्पा ओलांडला

0

नवी दिल्ली: जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने भारतात कहर केला आहे. दररोज ७०-७५ हजारपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. मात्र सोमवारी मागील २४ तासात काही महिन्यातील सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे रुग्ण वाढीचा वेग मंदावल्याचे दिसून आले होते. मात्र पुन्हा एकदा कोरोना रुग्ण वाढीने उसळी घेतली आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी १० टक्के रुग्ण अधिक आढळून आले. मंगळवारी गेल्या २४ तासांतील आकडेवारी जाहीर करण्यात आली. यात कालच्या तुलनेत १० हजारांपेक्षा रुग्णवाढ झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या २४ तासांत देशात ७२ हजार ४९ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर ९८६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या वाढून आता ६७ लाख ५७ हजार १३२ इतकी झाली आहे. यात ९ लाख ७ हजार ८८३ रुग्ण उपचार घेत आहेत. तर ५७ लाख ४४ हजार ६९४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. देशातील आतापर्यंतचा करोनाबळींचा आकडा १ लाख ४ हजार ५५५ वर पोहोचला आहे.

देशातील करोना प्रसाराचा वेग कायम असला, तरी रुग्णवाढ कमी होत असल्याचे दिसत आहे. ऑगस्टनंतर मागील दोन आठवड्यांपासून कमी रुग्ण आढळून येत असल्याचे चित्र आहे. तर ऑगस्टनंतरची सर्वात कमी रुग्णवाढ मंगळवारी नोंदवण्यात आली. देशात ६१,२६७ आढळून आले होते.

महाराष्ट्रात नव्या करोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मंगळवारी जवळपास १२ हजार नवे रुग्ण आढळले तर दिवसभरात १७ हजार रुग्ण करोनामुक्त झाले. करोनामुक्तांचे प्रमाण ८०.४८ टक्क्यांवर गेले आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या १४,६५,९११ झाली आहे. त्यापैकी एकूण ११ लाख ७९ हजार ७२६ करोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात दिवसभरात ३७० रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांची एकूण संख्या ३८,७१७ वर पोहोचली आहे. हे प्रमाण २.६४ टक्के आहे.