भुसावळ प्रतिनिधी l
जिल्हा पोलिस दलाच्या अस्थापनेवरील बदलीस पात्र कर्मचाऱ्यांची महिनाअखेर बदली होण्याचे संकेत जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिले आहेत. कार्यकाळ संपलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची इच्छित जागेवरील बदलीसाठी धावपळ सुरू झाली आहे.
एकाच पोलिस ठाण्यात सहा वर्षे, एका उपविभागात १२ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कार्यकाळ होत असलेल्या बदली पात्र कर्मचाऱ्यांची यादी तयार झाली आहे.बदलीसाठी पात्र कर्मचाऱ्यांना इच्छित जागांसाठी बदली समितीला तीन पसंतीक्रम दर्शवायचे असून, पहिल्या पसंतीक्रमात सर्वाधिक पसंती एलसीबी, वाहतूक शाखेसह व्यस्त असलेल्या पोलिस ठाण्यांना दिली आहे.
ठाणे हवे ते नकोत
त्यात एमआयडीसी, चाळीसगाव, रावेर, भुसावळ तालुका, जळगाव तालुका, सायबर पोलिस ठाणे, जामनेर, नशिराबाद, पाळधी दूरक्षेत्र, महामार्ग वाहतूक शाखा आदींसाठी पहिला पसंतीक्रम नोंदविण्यात आला आहे. रामानंद, भुसावळ बाजारपेठ, जळगाव शहर, अमळनेर तालुक्यातील मारवड, मुक्ताईनगर, कासोदा आदी पोलिस ठाण्यांना कर्मचाऱ्यांनी नापसंती दर्शविली आहे.
वशिल्यांसाठी धावपळ
जिल्ह्यातील आमदारांचे सुरक्षारक्षक, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आरटीपीसी, उल्लेखनीय कामगिरीत सहभागी कर्मचाऱ्यांनी नियोजित बदलीची पूर्वीपासूनच तयारी करून ठेवली असून, विधानसभा मतदारसंघातील कर्मचाऱ्यांच्या त्या-त्या ठिकाणचे आमदार, मंत्र्यांकडे चकरा वाढल्या आहेत.
बदल्यांसाठी पूर्वी जामनेर आणि मुक्ताईनगर, अशा दोनच याद्या असायच्या. आता मात्र पाळधी, पाचोरा, अमळनेर आणि चाळीसगावचीही यादीत भर झाली आहे.