इंडोनेशिया :- गेल्या २४ तासामध्ये दहशतवाद्यांनी इंडोनेशियावर दुसरा हल्ला चढवला आहे. त्यांनी आज (सोमवारी) पोलीस मुख्यालयाला लक्ष्य केले. सुरबायातील पोलीस मुख्यालयाजवळ दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी आत्मघाती स्फोट घडवला. या स्फोटामध्ये एकाचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये चार पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
हे देखील वाचा
दहशतवाद्यांनी रविवारी इंडोनेशियात तीन चर्चना लक्ष्य करून हल्ले केले होते. या हल्ल्यामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला होता. तर ४१ जण जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर २४ तासांच्या आत इंडोनेशिया पुन्हा एकदा आत्मघाती स्फोटाने हादरले. घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा सर्व प्रकार कैद झाला आहे. मुख्यालयाजवळील पोलीस स्टेशन कार पार्किंगजवळ दुचाकीवरुन एक पुरुष आणि एक महिला आली. चेक पॉईंजवळ येताच त्यांनी आत्मघाती स्फोट घडवला. आयसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सोमवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी निषेध दर्शवला आहे. आयसिसविरोधात लढा देण्यासाठी पुढील महिन्यात संसदेत सुधारित दहशतवादविरोधी कायदा मांडला जाईल. हा कायदा मंजूर झाल्यानंतर आयसिसविरोधात कठोर कारवाई करता येईल, असे त्यांनी सांगितले.