इंडोनेशिया त्सुनामी: मृतांचा आकडा २८१ वर !

0

जकार्ता-इंडोनेशियाला त्सुनामीचा तडाखा बसला आहे. मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत येथे २८१ जणांचा मृत्यू झाला असून एक हजाराहून अधिक लोक जखमी आहेत. अजूनही मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शनिवारी रात्री ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर येथे त्सुनामी उसळली. या त्सुनामीचा सर्वाधिक फटका जावा व सुमात्रा बेटांदरम्यानच्या सुंदा पट्ट्याला बसला. शनिवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास समुद्रात अनॅक क्रॅकोटा या ज्वालामुखीचा स्फोट होऊ लागला. त्यानंतर काही वेळातच या बेटांना त्सुनामीचा तडाखा बसला. समुद्रात उसळलेल्या उंचच उंच लाटांनी किनाऱ्यांवर धडक दिली.

या लाटांचा जबर तडाखा किनाऱ्यांवरील शेकडो हॉटेले, घरे आणि इमारतींना बसला. काही क्षणांतच होत्याचे नव्हते होऊन गेले. या किनारपट्टीवर सगळीकडे उद्ध्वस्त झालेली घरे, पडलेली हॉटेले, इतस्ततः विखुरलेले सामान असे दृश्य दिसत होते. हजारो घरे उध्वस्त झाल्यामुळे लोकं रस्त्यावर आली आहेत. तसेत जागोजागी भूस्खलन झाल्यामुळे अनेकजण अद्याप बेपत्ता असल्याचे समजते. स्थानिक प्रशासनाने मदत व बचाव कार्य युद्धपातळीवर हाती घेतले आहे.