प्रक्षोभक भाषण करणार्‍यात भाजप अव्वल

0

यादीत भाजपचे 10 खासदार आणि 17 आमदार

मुंबई । प्रक्षोभक भाषण करणार्‍यांच्या यादीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे 10 खासदार आणि 17 आमदार आहेत. यातील चार आमदार महाराष्ट्रातील आहेत. तर शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचेही नाव या यादीत आहे. देशातील निवडणुकीबाबतचा अभ्यास करणारी संस्था, असोसिएशन ऑफ डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्स म्हणजेच एडीएआरने नवा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

देशभरातील प्रक्षोभक भाषण करणार्‍या आमदार-खासदारांबाबतचा हा अहवाल आहे. प्रक्षोभक भाषण करणार्‍या आमदारांमध्ये महाराष्ट्रातील 4 आमदारांचा समावेश आहे. तर तेलंगणात सर्वाधिक 11, उत्तरप्रदेश 9, बिहार 4, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक प्रत्येकी तीन, उत्तराखंड आणि पश्‍चिम बंगाल प्रत्येकी 2, तर गुजरात, मध्यप्रदेश, तामिळनाडू, राजस्थान आणि झारखंडमध्ये प्रत्येकी 1 आमदारावर प्रक्षोभक भाषणप्रकरणी गुन्हा दाखल आहे. देशातील सध्याच्या 58 आमदार, खासदारांनी प्रक्षोभक भाषणाप्रकरणी आपल्यावर गुन्हा दाखल झाला असल्याचे जाहीर केले आहे.