नवी दिल्ली: १९९६ मध्ये स्थापना झालेली बंगळुरूस्थित स्वयंसेवी संस्था इन्फोसिस फाऊंडेशनची नोंदणी विदेशी देणग्या प्राप्त करताना नियमांचा भंग केल्याच्या आरोपावरुन केंद्रीय गृह मंत्रालयाने रद्द केली आहे. मात्र, इन्फोसिस फाऊंडेशनकडूनच गृह मंत्रालयाकडे नोंदणी रद्द करण्याची विनंती करण्यात आली होती, त्यानंतरच नोंदणी रद्द करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
आम्हीच गृह मंत्रालयाला नोंदणी रद्द करण्याची विनंती केली होती, त्यानंतरच नोंदणी रद्द करण्यात आल्याचं इन्फोसिस फाऊंडेशनच्या कॉर्पोरेट मार्केटिंग व संपर्क विभागचे प्रमुख ऋषी बसू यांनी सांगितले आहे. विदेशी देणग्या मिळविण्यासाठी सर्व स्वयंसेवी संस्थांना विदेशी योगदान (नियमन) कायद्यान्वये नोंदणी करणे आवश्यक आहे. एफसीआरए या लघु नावाने हा कायदा परिचित आहे. २०१६ मध्ये करण्यात आलेल्या सुधारणेनुसार इन्फोसिस फाऊंडेशन ‘एफसीआरए’च्या कक्षेत येत नाही. त्यामुळे आम्ही गृह मंत्रालयाला नोंदणी रद्द करण्याची रीतसर विनंती केली होती. आमची विनंती मान्य केल्याबद्दल आम्ही गृह मंत्रालयाचे आभार मानतो, असे बसू यांनी सांगितले. १९९६ मध्ये स्थापना झालेली असून, सुधा मूर्ती फाऊंडेशनच्या चेअरमन आहेत.