लंडन-भारत-इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीत इंग्लंडने भारतावर चौथ्या दिवशी ३१ धावांनी विजय मिळवला. १९४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा दुसरा डाव १६२ धावांवर आटोपला. या विजयासह इंग्लंडने ५ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या डावात विराट कोहलीने अर्धशतकी खेळी केली. हार्दिक पांड्याने देखील चांगली खेळी केली. पण अखेर भारताच्या पदरी निराशाच आली.
बेन स्टोक्सने ४, अँडरसन आणि ब्रॉडने २-२, तर कुरान आणि रशीदने १-१ विकेट घेतली.
विराट कोहली आणि दिनेश कार्तिक यांनी आज दिवसाच्या खेळाला सुरुवात केली होती. पण पहिल्याच षटकात भारताला धक्का बसला. दिनेश कार्तिक २० धावांवर बाद झाला. कर्णधार कोहलीने अर्धशतक ठोकले पण नंतर लगेच बेन स्टोक्सने त्याला पायचीत केले. कोहलीने ९३ चेंडूत ५१ धावा केल्या. त्याच षटकात मोहम्मद शमीदेखील बाद झाला. फिरकीपटू आदिल रशीद याने इशांत शर्माला (११) पायचीत केले. फिरकीपटू आदिल रशीद याने इशांत शर्माला पायचीत केले. हार्दिक पांड्याने काही काळ झुंज देत ६१ चेंडूत ३१ धावा केल्या. पण अखेर बेन स्टोक्सने त्याला झेलबाद केले आणि डावातील चौथा गडी टिपत सामना आपल्या संघाला जिंकवून दिला.