सरन्यायाधीशांविरोधात रचण्यात आलेल्या षडयंत्राची होणार चौकशी; समिती नियुक्त

0

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहे. या आरोपामागे षडयंत्र रचण्यात आल्याचे आरोप न्या.गोगोई यांनी केला होता. त्यामुळे षडयंत्राचा तपास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कठोर पावले उचलली असून, या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती ए.के. पटनाईक यांच्या नेतृत्वाखालील समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. देशाच्या सरन्यायाधीशांवरच लैंगिक शोषणाचे आरोप झाल्याने न्यायव्यवस्थेसह देशभरात खळबळ उडाली आहे.

मात्र सरन्यायाधीशांविरोधात करण्यात आलेले लैंगिक शोषणाचे आरोप हे एका कारस्थानाचा भाग असल्याचा दावा अॅड. उत्सव सिंह बैंस यांनी केला होता. तसेच या संदर्भात त्यांनी काही कागदपत्रेही सादर केली होती. त्यानंतर ही कागदपत्रे तसेच सीसीटीव्ही फूटेज न्यायालयाने ताब्यात घेऊन सील केले होते. आता या संदर्भात निवृत्त न्यायमूर्ती ए.के. पटनाईक हे चौकशी करतील. तसेच सीबीआयचे संचालक आणि आयबीचे संचालक त्यांना तपासकार्यामध्ये सहकार्य करतील असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.