नवी दिल्ली- देशाची पहिली अण्वस्र वाहक पाणबुडी आयएनएस अरिहंतने सोमवारी आपली पहिली गस्ती मोहिम यशस्वीरित्या पूर्ण केली. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पाणबुडीवरील कर्मचाऱ्यांना संबोधित केले. अरिहंतचा अर्थ शत्रूला नष्ट करणे हा आहे. आयएनएस अरिहंत ही सव्वाशे कोटी भारतीयांच्या सुरक्षेची हमी आहे. भारताच्या शत्रूला आणि शांततेविरोधात कारवाया करणाऱ्यांना ही पाणबुडी खुले आव्हान आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
आयएनएस अरिहंत पाणी, जमीन आणि आकाशातून हल्ला करण्यास सक्षम आहे. भारताकडे जमीनीवरुन लांब पल्ल्यावरील लक्ष्यभेद करणारी अग्नी क्षेपणास्रे पहिल्यापासून आहेत. त्याचबरोबर अणू हल्ल्याला उत्तर देण्यासाठी सक्षम लढाऊ विमाने देखील आहेत. आता आयएनएस अरिहंतमध्ये पाण्याखालील अण्वस्र हल्ल्याचा शोध घेऊन त्याला उत्तर देण्याची क्षमता आहे.
आपल्या शेजारील राष्ट्रांमध्ये अण्वस्रांच्या संख्येमध्ये वाढ होत असताना देशात विश्वसनीय अण्वस्र क्षमता निर्माण करणे खूपच गरजेचे आहे. अरिहंतमुळे आपण आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम होऊन शत्रूला सडेतोड उत्तर देऊ शकू असेही मोदींनी पाकिस्तानचे नाव न घेता सांगितले.
मोदी म्हणाले, आयएनएस अरिहंत भविष्यातील भारतासाठी एक महत्वपूर्ण पाऊल असेल. भारत कोणातीही खोड काढत नाही. मात्र, भारताची छेड जर कोणी काढली तर त्याला भारत सोडत नाही. आपली अण्वस्र क्षमता ही आक्रमणाचा भाग नाही, मात्र सुरक्षेचे उपकरण आहे. शांती, सुरक्षा आणि स्थिरतेसाठी आपली अण्वस्र क्षमता खूपच महत्वाची आहे.