रस्त्यावर कचखडीऐवजी टाकली पिवळी माती
अवकाळी पावसाने चिखलात रुतताहेत वाहने न.पा. च्या बोगस कारभाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप
यावल प्रतिनिधी ।
येथील पोलीस स्टेशनसमोर खराब झालेल्या रस्त्यावर यावल नगरपालिका प्रशासनाने बुद्धीचा वापर न करता चुकीचा निर्णय घेऊन बारीक कच न टाकता पिवळी माती टाकल्याने तसेच आज दुपारी चार वाजेच्या सुमारास अवकाळी पाऊस झाल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पिवळ्या मातीचा गारा झाल्याने रहदारीस मोठा अडथळा निर्माण झाला. यामुळे यावल नगरपालिकेच्या बोगस कारभाराबाबत नागरिकांमध्ये मोठा तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. यावल शहरात बुरूज चौकापासून यावल पोलीस स्टेशन समोरून सातोद, कोळवद, बड़ी, परसाडे रस्ता मोठ्या प्रमाणात सार्वजनिक वापराचा रस्ता आहे. या ठिकाणी सातोद कडे जाणाऱ्या रस्त्याच्या वळणावर नगरपालिकेच्या पाण्यामुळे रस्ता खराब झाला होता त्या ठिकाणी खड़ी टाकलेली होती. या खडीमुळे दुचाकी वाहनधारकांना, व पायदळ चालणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. ५ ते ६ दिवसापूर्वी याच रस्त्यावर मरीमातेच्या नावाने बारागाड्या ओढल्या गेल्या त्यावेळेस नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून यावल नगरपालिकेने त्या खडीवर बारीक कच न टाकता पिवळी माती टाकली..
त्यात शुक्रवारी, २८ रोजी आठवडेबाजाराचा दिवस आणि याच रोडवर पुढे यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे मतदान केंद्र असल्याने रस्त्यावर मोठी वाहतूक होती. त्यात सायंकाळी चार वाजता पाऊस सुरु झाल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टाकलेल्या पिवळ्या मातीचा गारा झाला त्या ठिकाणाहून दुचाकी वाहने व पायदळ येणाया जाणाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. पाच-सहा दिवसापूर्वी बारागाड्या ओढल्या त्यामुळे एक दिवस आधी नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून रस्त्यावरील खडीवर बारीक कच टाकण्याऐवजी पिवळी माती टाकण्याचा चुकीचा निर्णय यावल नगरपरिषदेने घेतल्याने यावल नगरपरिषद प्रशासनाचे बौद्धिक दिवाळे निघाले आहे का? आणि हे बौद्धिक दिवाळे यावल पोलिसांच्या साक्षीने सार्वजनिक वापराच्या ठिकाणी अडथळा निर्माण झाल्याने पोलीस स्वतः फिर्यादी होऊन काही कारवाई करणार आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्या ठिकाणी यावल पोलिसांनी सार्वजनिक वापराचा रस्ता लक्षात घेता यावल नगरपालिकेमार्फत त्या जागेवर बारीक कच टाकण्याची कारवाई तात्काळ करावी, असे नागरिकांमध्ये चर्चिले जात आहे.