हैद्राबाद: आंध्र प्रदेशमध्ये बहुमताने सरकार स्थापन करणाऱ्या मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या सरकारने पहिल्याच अर्थसंकल्पात मोठा निर्णय घेतला आहे. आज आंध्र प्रदेश सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर झाला. आंध्र प्रदेशचे अर्थमंत्री बुग्गना राजेंद्रनाथ यांनी विधानसभेत अर्थसंकल्प मांडला. यात आंतरजातीय विवाहासाठी ४१ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारने या निर्णयामुळे आंध्र प्रदेशमध्ये आंतरजातीय विवाहाचे प्रमाण वाढेल, अशी शक्यता वर्तवली आहे. आंध्र प्रदेशात गेल्या काही महिन्यात आंतरजातीय विवाहातून हल्ला झाल्याच्या घटना वाढल्या आहेत. याच पार्श्वभुमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी याआधी गतवर्षी आंतरजातीय विवाहासाठी चंद्रान्ना पेल्ली कनुका अशी योजना सुरु केली होती. या योजनेनुसार अनुसुचीत जातीच्या मुलाने अनुसुचीत जातीच्या मुलीसोबत लग्न केलं तर सरकारकडून ४० हजार रुपयांची मदत दिली जात होती. तसंच इतर मागासवर्गीय मुलाने इतर मागासवर्गीय मुलीसोबत लग्न केलं तर सरकारकडून ३० हजार रुपये दिले जात होते. पण आता या रकमेत वाढ केली जाऊ शकते.