न्युयोर्क- दक्षिण कोरियाचे किम जोंग यांग यांची इंटरपोलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधातील रशियन अधिकाऱ्याचा या पदासाठीच्या लढतीत किम यांनी पराभव केल्याने पाश्चिमात्य देशांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. यांग हे आता मेंग होंगवेई यांची जागा घेणार असून २०२० पर्यंत अधिकारपदावर राहतील.
किम यांना अमेरिकेचा पाठिंबा असून ते सध्या इंटरपोलचे हंगामी अध्यक्ष आहेत. दुबई येथे इंटरपोलच्या सदस्य देशांची बैठक झाली त्यात आधीचे मूळ चीनचे असलेले अध्यक्ष मेंग होंगवेई सप्टेंबरमध्ये बेपत्ता झाल्याच्या घटनेनंतर रिकाम्या झालेल्या अध्यक्षपदी यांग यांची निवड करण्यात आली. चीनने म्हटले आहे की, मेंग हे बेपत्ता झाले होते हे खरे असले तरी त्यांनी लाचखोरीच्या प्रकरणात राजीनामा दिला आहे. पाश्चिमात्य देशांना इंटरपोलच्या अध्यक्षपदी रशियाचे उमेदवार अलेक्झांगर प्रॉकोपचुक यांची निवड होणे धोक्याचे वाटत होते. प्रॉकोपचुक हे इंटरपोलचे उपाध्यक्ष असून त्याआधी रशियाच्या अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाचे अधिकारी होते.
अमेरिकी परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी किम यांना पाठिंबा दिला होता त्यामुळे त्यांचे पारडे जड होते, आता किम हे २०२० पर्यंत अधिकारपदावर राहतील. इंटरपोलचे सदस्य असलेल्या देशांनी कायद्याचा मान राखणे अपेक्षित आहे. किम ती जबाबदारी पार पाडण्यात कमी पडणार नाहीत असे पॉम्पिओ यांनी म्हटले होते.