IPL लिलाव: ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स ठरला यंदाच्या हंगामातील सर्वात महागडा

0

कोलकाता : IPL 2020 हंगामासाठी कोलकाता येथे खेळाडूंचा आज गुरुवारी लिलाव सुरु आहे. यावेळी 73 खेळाडूंचा लिलाव होत आहे. यापैकी 29 खेळाडू विदेशी आहेत. सर्वात जास्त दोन कोटी रुपये मूळ किंमत असलेल्या गटात सात खेळाडू आहेत. तर दीड कोटी रुपये मूळ किंमत असलेल्या गटात 23 खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स यंदाच्या आयपीएल हंगामातील सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला कोलकाता संघाने १५ कोटी ५० लाखात खरेदी केले आहे. पॅट कमिन्स हा सध्या ऑस्ट्रेलियन संघाचा उपकर्णधार आहे. जलदगती गोलंदाज असल्याने त्याला मोठी किंमत मिळाली आहे.

अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीत 20 लाख मूळ किंमत असलेल्या गटात 183 खेळाडू, 40 लाख मूळ किंमत असलेल्या गटात 7 खेळाडू आणि 30 लाख मूळ किंमत असलेल्या गटात 8 खेळाडूंचा समावेश आहे. जे खेळाडू कसोटी, वनडे आणि टी-20 मधील कुठल्याही प्रकारात आपल्या देशातसाठी खेळले असतील ते कॅप्ड श्रेणीत येतात आणि जे खेळाडू देशाकडून खेळले नसतील ते अनकॅप्ड श्रेणीत येतात.

यावेळी लिलावात अनकॅप्ड खेळाडूंना तीन वेगवेगळ्या बेस प्राईसमध्ये ठेवण्यात आले आहे. यामध्ये 20 लाख, 30 लाख आणि 40 लाख या तीन श्रेणी आहेत. याआधी या 10 लाख, 20 लाख आणि 30 लाख होत्या. कॅप्ड खेळाडूंसाठी 5 वेगवेगळ्या बेस प्राईस ठरवण्यात आल्या आहेत. यामध्ये 50 लाख, 75 लाख, 1 कोटी, 1.5 कोटी आणि दोन कोटी या श्रेणी ठेवण्यात आल्या आहेत.

सनरायझर्स हैदराबादने विराट सिंहला 1 कोटी 90 लाख , कोलकाता नाईट रायडर्सने राहुल त्रिपाठीला 60 लाख, दिल्ली कॅपिटल्सने अॅलेक्स कॅरीवर 2.40 कोटी, नॅथन कल्टर नाईलला मुंबई इंडियन्सने 8 कोटीमध्ये विकत घेतले आहे.