नवी दिल्ली :- आयपीएलमध्ये गुरुवारी दिल्ली आणि हैदराबाद यांच्याता झालेल्या लढतीमध्ये रिषभ पंत याने धडाकेबाज फलंदाजी करत शतकी खेळी केली. रिषभने केवळ ६३ चेंडूत १५ चौकार व ७ षटकार ठोकत नाबाद १२८ धावा केल्या. विशेष म्हणजे २० वर्षीय रिषभ हा शतक झळकावणारा इतिहासातील दुसरा युवा फलंदाज ठरला. गुरुवारी रिषभने हैदराबादच्या गोलंदाजांची धुलाई करत संघाला १८७ धावांचा पल्ला गाठून दिला. परंतू रिषभ पंतच्या 128 धावांच्या झंझावाती खेळीनंतरही दिल्ली डेअरडेव्हिल्सला या लढतीत पराभव पत्करावा लागला. सनरायजर्स हैदराबादने ९ गडी राखून दिल्ली डेअर डेव्हिल्सवर मात मिळविली.
प्रथम फलंदाजी करीत दिल्ली डेअर डेव्हिल्सने हैदराबादसमोर १८७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादचा सलामीवीर अॅलेक्स हेल्स अवघ्या १४ धावांवर माघारी परतल्यानंतर शिखर धवन व केन विल्यमन्सन जोडीने संघाला विजय मिळवून दिला. शिखर धवनने ५० चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांची बरसात करत नाबाद ९२ धावांची खेळी केली. तर केन विल्यमसनने ५३ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकार मारत नाबाद ८३ धावांची खेळी केली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी १७६ धावांची भागीदारी केली.