मुंबई – आयपीएलमधील ११ व्या शेत्रात चेन्नई सुपरकिंग्जने तिसरे विजेतेपद पटकावून मोठ्या दिमाखात पुनरागमन केलं आहे. सलामीवीर शेन वॉटसन (११७*)ने झळकावलेल्या धडाकेबाज नाबाद शतकाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने सनराईजर्स हैदराबादवर ८ गडी राखून अकराव्या हंगामाचं विजेतेपद मिळवले. या शानदार कामगिरीसह चेन्नईने मुंबई इंडियन्सच्या सर्वाधिक ३ विजेतीपदे पटकावण्याच्या पराक्रमाची बरोबरी केली.
प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने २० षटकांत ६ बाद १७८ धावांचे आव्हान चेन्नईसमोर ठेवले होते. आव्हानचे पाठलाग करताना चेन्नईने १८.३ षटकांतच केवळ २ फलंदाजांच्या मोबदल्यात १८१ धावा काढल्या. चेन्नईकडून फाफ डू प्लेसिस (१०) अपयशी ठरल्यानंतर सुरेश रैनाने २४ चेंडूंत ३ चौकार व एका षटकारासह ३२ धावा करत वॉटसनला चांगली साथ दिली. वॉटसन – रैना यांनी दुसºया गड्यासाठी ११७ धावांची भागीदारी करून संघाचा विजय आवाक्यात आणला. १४ व्या षटकात रैना बाद झाल्यानंतर अंबाती रायुडूने १९ चेंडूंत नाबाद १६ धावा काढून वॉटसनला अखेरपर्यंत साथ दिली. वॉटसनने अखेरपर्यंत झुंज देत ५७ चेंडूंत ११ चौकार व ८ षटकारांची आतषबाजी करताना नाबाद ११७ धावांची खेळी केली. विशेष म्हणजे त्याने झळकावलेले शतक आयपीएलच्या इतिहासात अंतिम सामन्यातील केवळ दुसरेच शतक ठरले. तसेच यंदाच्या सत्रात वॉटसनचे हे दुसरे, तर स्पर्धा इतिहासात एकूण चौथे शतक ठरले. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात तोडीस तोड खेळ झाला. पण तब्बल सहा अंतिम सामन्यांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या चेन्नईच्या नियोजनबद्ध खेळीपुढे हैदराबादचा निभाव लागला नाही.
हैद्राबादच्या तत्पूर्वी, कर्णधार केन विल्यम्सन आणि युसुफ पठाण यांच्या जोरावर हैदराबादने आव्हानात्मक मजल मारली. विल्यम्सनने ३६ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४७, तर युसुफने २५ चेंडूत ४ चौकार व २ षटकारांसह नाबाद ४५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. याशिवाय शिखर धवन (२६), शाकिब- अल-हसन (२३) आणि कार्लोस ब्रेथवेट (२१) यांनीही चांगली फलंदाजी केली. लुंगी एन्गिडी, शार्दुल ठाकूर,कर्ण शर्मा, ड्वेन ब्राव्हो आणि जडेजा यांनी प्रत्येकी एक बळी घेत चांगला मारा केला.
धावसंख्या
सनरायझर्स हैदराबाद : २० षटकांत ६ बाद १७८ धावा (केन विल्यम्सन ४७, युसुफ पठाण ४५; रवींद्र जडेजा १/२४, कर्ण शर्मा १/२५, लुंगी एन्गिडी १/२६, शार्दुल ठाकूर १/३१, ड्वेन ब्राव्हो १/४६.) पराभूत वि.
चेन्नई सुपर किंग्ज : १८.३ षटकांत २ बाद १८१ धावा (शेन वॉटसन नाबाद ११७, सुरेश रैना ३२; कार्लोस ब्रेथवेट १/२७, संदीप शर्मा १/५२.)