चेन्नई विजयासह प्लेऑफमध्ये ; पंजाबवर पाच विकेट राखून विजय

0

आयपीएल स्पर्धेमधील अखेरच्या सुपरसाखळी सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने किंग्ज इलेव्हन पंजाबचा पाच विकेट व पाच चेंडू राखून पराभव करत प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. चेन्नईकडून सुरेश रैनाने 48 चेंडूत नाबाद 61 धावा केल्या. तर चहारने 20 चेंडूत 39 धावा केल्या. या दोघांनीही खडतर परिस्थितीमधून संघाचा डाव सावरत चेन्नईला विजयसमीप आणून ठेवले. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीने षटकार खेचत विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

प्रथम फलंदाजी करत पंजाबकडून करुण नायरची आक्रमक फटकेबाजी वगळता इतर फलंदाजांनी साफ निराशा केली. करुण नायरने केलेल्या 26 चेंडूत 54 धावांच्या धडाकेबाज खेळी केली. करुण नायर याच्या झंझावती अर्धशतकामुळे पंजाबला १९.३ षटकांत सर्वबाद १५३ धावांपर्यंतच मजल मारता आली. पंजाबने चेन्नईसमोर विजयासाठी १५४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. चेन्नईकडून लुंगी निगिडीने भेदक मारा करत पंजाबच्या 4 फलंदाजांना परतीची वाट दाखवली. विजयासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नईची सुरुवात खराब झाली. मात्र रैनाच्या धडाकेबाज खेळीने तसेच दीपक चहारने केलेल्या झंझावती ३९ धावांचा बळावर चेन्नईने १९.१ षटकांत व पाच गडय़ांच्या मोबदल्यात १५४ धावांचे लक्ष्य पार केले. भरवशाचा सलामीवीर अंबाती रायुडू केवळ एक धाव काढून बाद झाला. डावाच्या पाचव्या षटकांत अंकित रजपूतने फॅफ डय़ू प्लेसिस (१४) व सॅम बिलिंग्ज (०) यांना बाद करीत चेन्नईची ३ बाद २७ अशी स्थिती केली. साहजिकच चेन्नईच्या धावांच्या वेगावरही अंकुश घातला गेला. पहिल्या दहा षटकांत त्यांच्या जेमतेम ३ बाद ५८ धावा झाल्या होत्या. पंधराव्या षटकांत दीपक चहारने लागोपाठ दोन षटकार ठोकून कंटाळलेल्या प्रेक्षकांना खेळाचा आनंद मिळवून दिला. या षटकांत चेन्नईने २१ धावा वसूल करून खेळाचा रंग पालटवला. चहारने एक चौकार व तीन षटकारांसह ३९ धावा केल्या. त्याने संघास विजयाच्या दृष्टीपथात आणले. रैनाने त्यानंतर आक्रमक पवित्रा घेत कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या साथीने विजय मिळवला.

धावसंख्या
किंग्ज इलेव्हन पंजाब : १९.४ षटकांत सर्व बाद १५३ (करुण नायर ५४; लुंगिसानी एन्गिडी ४/१०) पराभूत वि.
चेन्नई सुपर किंग्ज : १९.१ षटकांत ५ बाद १५९ (सुरेश रैना नाबाद ६१ , दीपक चहार ३९; अंकित राजपूत २/१९ )