नवी दिल्ली :– घरच्या मैदानावर खेळणा-या दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने कोलकाता नाइट रायडर्सला ५५ धावांनी नमवून पराभवाची मालिका संपवली. गौतम गंभीरने कर्णधारपद सोडल्यानंतर नवनिर्वाचित कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पृथ्वी शॉ यांच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर दिल्लीने २२० धावांचं तगडं आव्हान कोलकात्यासमोर ठेवलं होतं. लक्ष्याचा पाठलाग करीत कोलकात्याचा संघ २० षटकात ९ गडीबाद केवळ १६४ धावाच बनवू शकला. पाच पराभवानंतर दिल्लीने सातव्या सामन्यात दोन वेळच्या चॅम्पियन कोलकाता नाइट रायडर्सवर ५५ धावांनी मात केली. कोलकात्याकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक ३० चेंडूत ४४ धावा केल्या. तर शुभमन गिलने २९ चेंडूत ३७ धावा काढल्या , पण चांगली स्थिती असतांना शुभमन धावबाद झाला.
मुंबईचा युवा फलंदाज श्रेयस अय्यरने कर्णधारपदाची जबाबदारी सार्थकी लावताना दिल्लीची पराभवची मालिका खंडित केली. त्याने फक्त 40 चेंडूंत 3 चौकार आणि दहा षटकारांच्या जोरावर नाबाद 93 धावांची तुफानी खेळी साकारली. पृथ्वी शॉ आणि कॉलिन मुनरोने सुरुवातीपासूनच गोलंदाजांवर तुटून पडत फटकेबाजी सुरु केली. पृथ्वीने दमदार सलामी देताना 44 चेंडूंत 7 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 62 धावा केल्या. पृथ्वी हा आयपीएलच्या इतिहासातील अर्धशतक ठोकणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला.
धावसंख्या
दिल्ली डेअरडेव्हिल्स : २० षटकांत ४ बाद २१९ (श्रेयस अय्यर नाबाद ९३, पृथ्वी शॉ ६२; आंद्रे रसेल १/२८) विजयी वि.
कोलकाता नाइट रायडर्स : २० षटकांत ९ बाद १६४ (आंद्रे रसेल ४४, शुभमन गिल ३७; ग्लेन मॅक्सवेल २/२२)