जयपूर :- जोश बटलरच्या धडाकेबाज खेळीने राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जवर एक चेंडू आणि चार गडी राखून विजय मिळवला. चेन्नई सुपर किंग्जने १७७ धावांचे आव्हान राजस्थान पुढे ठेवले होते. राजस्थाने हे आव्हान १९.५ षटकात ४ बाद १७६ पूर्ण केले. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी उतरलेल्या राजस्थानच्या जोश बटलर याने संपूर्ण संघाची जबाबदारी घेत त्याने बेन स्टोंक्स याच्यासोबत चार षटकांत ४८ धावांची भागीदारी केली. हरभजन सिंगने स्ट्रोक्सला ११ धावांवर बाद केले. त्यानंतर अजिंक्य रहाणेही ४ धावांवर बाद झाला. यामुळे राजस्थानवरील दबाव वाढला. संजू सॅमसनही २१ तर प्रशांत चोप्रा ८ धावांवर माघारी परतले. त्यामुळे बटलरचा वेगही मंदावला. स्टुअर्ट बिन्नी २२ धावांची खेळी करत माघारी परतला. कृष्णप्पा गौतमने मोक्याच्या क्षणी चार चेंडूत १३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. शेवटच्या महत्त्वपूर्ण षटकांत १२ धावांची आवश्यकता होती. पण बटलर मैदानात असल्याने राजस्थानने पाच चेंडूमध्ये १२ धावा केल्या आणि स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईला २० षटकांत ४ गडी गमावून १७६ धावा करता आल्या. सलामीवीर शेन वॉटसनने ३९ धावांची खेळी केली. तर सुरेश रैनाने ५२ धावांची खेळी करत संघाचा डाव पुढे नेला. रैनाने ३५ चेंडूत ५२ धावा केल्या. धोनीने २३ चेंडूत नाबाद ३३ धावांची खेळी केली. तर सॅम बिलिंग्ज याने २२ चेंडूत २७ धावांची खेळी केली. राजस्थानच्या जोफ्रा आर्चर याने दोन तर ईश सोढी याने एक गडी बाद केला.
धावसंख्या
चेन्नई सुपर किंग्ज २० षटकांत ४ बाद १७६ धावा (वॉटसन ३९, सुरेश रैना ५२, महेंद्रसिंह धोनी नाबाद ३३, बिलिंग्ज २७ गोलंदाजी : आर्चर २/४२, ईश सोढी १/२९)
राजस्थान रॉयल्स २० षटकांत ६ बाद १७७ धावा ( जोश बटलर नाबाद ९५, संजू सॅमसन २१, स्टुअर्ट बिन्नी २२, गौतम १३ गोलंदाजी : ठाकूर १/२२, हरभजन सिंह १/२९)