बेंगळूरुचा दिल्ली डेअरडेव्हिल्सवर ५ विकेट राखून विजय

0

बेंगळूरु : विराट कोहली आणि एबी डी’व्हिलियर्स यांच्या अर्धशतकी खेळीने रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर ५ विकेट राखून विजय मिळवला. दिल्लीच्या स्पर्धेत आव्हान कायम राखण्याच्या उरल्यासुरलेल्या आशा धुळीस मिळाल्या.

नाणेफेक जिंकून बेंगळूरुने यजमान दिल्लीला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. दिल्लीने रिषभ पंत आणि पदार्पणवीर अभिषेक शर्मा यांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर २० षटकांत ४ बाद १८१ धावा केल्या. पंतने ३४ चेंडूंत ६१ धावांची खेळी साकारली आणि त्यामध्ये ५ चौकार व ४ षटकारांचा समावेश होता. अभिषेकने पदार्पणातच जोरदार खेळ केला. त्याने १९ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ४६ धावा चोपल्या. कर्णधार श्रेयस अय्यर आणि पंत यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी करताना दिल्लीचा डाव सावरला. विजय शंकर आणि अभिषेक यांनी अखेरच्या पाच षटकांत नाबाद ६१ धावांची भागीदारी करून संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. दिल्लीने शनिवारच्या लढतीत तीन नव्या खेळाडूंना संधी दिली. अभिषेकसह नेपाळचा फिरकी गोलंदाज संदीप लामिछाने आणि दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज ज्युनियर डॅला हे प्रथमच आयपीएलमध्ये खेळले.

प्रत्युत्तरात बेंगळूरुची सुरुवात निराशाजनक झाली. पार्थिव पटेल आणि बढती मिळालेला मोईन अली दुहेरी आकडा न गाठताच माघारी परतले. त्यांना अनुक्रमे लामिछाने आणि ट्रेंट बोल्ट यांनी बाद केले. मात्र, विराट कोहलीने एक बाजू सांभाळताना बेंगळूरुचे आव्हान जिवंत राखण्यासाठी प्रयत्न केले. त्याला एबी डी’ व्हिलियर्सने उत्तम साथ दिली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. दरम्यान, कोहलीने आयपीएलमधील वैयक्तिक ३४वे अर्धशतक झळकावले. डी’व्हिलियर्सनेही अर्धशतकी खेळी करताना बेंगळूरुच्या विजयाचा मजबूत पाया रचला. अमित मिश्राने १४व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कोहलीला बाद केले. कोहलीने ४० चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ७० धावांची खेळी साकारली.