राजस्थानची पराभवाची मालिका खंडीत

0

जयपूर :- रविवारी झालेल्या लढतीतील पराभवाचा वचपा काढत राजस्थान रॉयल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबला १५ धावांनी धूळ चारत स्पर्धेतील आव्हान टिकवले आहे. सलामीवीर जोस बटलरने केलेल्या धडाकेबाज ८२ धावाच्या जोरावर राजस्थानने दिलेल्या १५९ धावांचा पाठलाग करताना पंजाबचा संघ २० षटकांत ७ बाद १४३ धावाच बनवू शकला.

राजस्थानने प्रथम फलंदाजी करत सलामीवीर बटलरच्या धडाकेबाज खेळीमुळे राजस्थान १५९ धावापर्यंत मजल मारू शकला. बटलर आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी अवघ्या ३.४ षटकांत ३७ धावांची सलामी दिली. बटलरने नऊ चौकार व एका षटकाराच्या बळावर ५८ चेंडूंत ८२ धावा फटकावल्या. त्याने संजू सॅमसनसह तिसऱ्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी करत संघाचा डोलारा सांभाळला. पंजाबतर्फे अँड्रय़ू टायने सर्वोत्तम गोलंदाजी करताना ३४ धावांत ४ बळी टिपले. लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबच्या संघाला ७ गड्यांच्या मोबदल्यात अवघ्या १४३ धावांपर्यंत मजल मारता आली. सलामीवीर ख्रिस गेल अवघी एक धाव काढून गौतमच्या फिरकीवर चकला. यानंतर धक्कादायक निर्णय घेत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येणारा कर्णधार रविचंद्रन अश्विन २ चेंडूंत एकही धाव न काढता गौतमच्याच गोलंदाजीवर माघारी परतला. लोकेश राहुलने एका बाजूने संघर्ष सुरू ठेवत त्याने ७० चेंडूंत ११ चौकार व दोन षटकारांसह नाबाद ९५ धावा केल्या. लीगमध्ये राजस्थानने सहा पराभवानंत चौथ्या विजयाची नोंद केली.