बंगळूरुचा पाच धावांनी पराभव
हैदराबाद :– घराच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा पाच धावांनी पराभव करत गुणतालिकेतील पहिले स्थान कायम राखले आहे. मोहम्मद सिराज आणि टीम साऊदी यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर बंगळुरुच्या संघाने हैदराबादला १४६ धावांवर रोखण्याची करामत केली. प्रत्युत्तरात बंगळुरूला ६ गड्यांच्या मोबदल्यात अवघ्या १४१ धावांपर्यंत मजल मारता आली. बंगळुरू संघाच्या विजयासाठी कर्णधार विराट कोहलीने एकाकी झुंज देताना सर्वाधिक ३९ धावांची खेळी केली. मात्र, इतर फलंदाजांना फार काळ मैदानावर आव्हान कायम ठेवता आले नाही. त्यामुळे टीमला पराभवाचा सामना करावा लागला. पार्थिव पटेलने २० आणि मनदीप सिंगने नाबाद २१ धावांचे योगदान दिले. मात्र, त्यांना टीमचा पराभव टाळता आला नाही.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या विराट कोहलीचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. हैदराबादकडून केन विल्यमसन आणि शाकीब अल हसनचा अपवाद वगळता उर्वरित फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही.बंगळुरुकडून साऊदी आणि सिराजने प्रत्येकी ३-३ बळी घेतले, त्याला उमेश यादव-युजवेंद्र चहलने १-१ बळी घेत चांगली साथ दिली. बंगळुरुची सलामीची जोडी २४ धावांवर फोडण्यात हैदराबादला यश आले. यानंतर कर्णधार विराट कोहलीने ३९ धावांची खेळी करत संघाचा धाव पुढे नेला. मात्र, त्याला अपेक्षित साथ मिळाली नाही. हैदराबादच्या संदीप शर्मा आणि भुवनेश्वर कुमारच्या भेदक माऱ्याने बंगळुरुच्या फलंदाजांवर लगाम लावला. दोघांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली, तर शाकीब अल हसनने ३६ धावांमध्ये दोन विकेट घेतल्या.