कोलकाता : आज इंडियन प्रीमिअर लीगमधील दुसऱ्या क्वालिफायर लढतीत कोलकाता नाइट रायडर्स व सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून कोणता संघ अंतिम फेरी गाठणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे.
चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध चुरशीच्या सामन्यात हैदराबादला पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता.या पराभवामुळे हैदराबादचा आत्मविश्वास नक्कीच कमी झाला आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा एकदा आपल्या अव्वल खेळासाठी त्यांना सज्ज व्हावे लागणार आहे. शिखर धवन व कर्णधार केन विल्यम्सन या दोघांवर हैदराबादची मदार असून यांच्यामधून एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकला तर खोऱ्याने धावा काढू शकतो. मनीष पांडे फॉर्मात आल्यामुळे हैदराबादला दिलासा मिळाला आहे. तरीही, शकिब अल हसन आणि युसुफ पठाण यांना खेळ उंचावण्याची गरज आहे.
कोलकाता संघाने गेल्या चार लढतीत चारही सामने जिंकत फॉर्मात आहे. कोलकाताने स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या शर्यतीतील सामन्यात राजस्थान रॉयल्सला धूळ चारून उपांत्य फेरी गाठली. कर्णधार दिनेश कार्तिकचा संघ सर्वच पातळींवर उल्लेखनीय प्रदर्शन करत असून घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना त्यांचे मनोबल आणखी उंचावलेले असेल. सलामीवीर सुनील नरिन व ख्रिस लिन, नितीश राणा, शुभमन गिल आणि धडाकेबाज आंद्रे रसेल अशी तुफानी फलंदाजी कोलकात्याच्या ताफ्यात आहे. फिरकीपटू कोलकात्याच्या विजयात खारीचा वाटा उचलत आहेत. त्यामुळे कुलदीप यादव, पीयुष चावला आणि नरिन यांच्यावर कोलकाता अवलंबून आहे. या सामन्यातील विजेता संघ २७ मे रोजी मुंबईत अंतिम लढतीत चेन्नईविरुद्ध खेळेल.
संघ
सनरायझर्स हैदराबाद : केन विलियम्सन (कर्णधार), शिखर धवन, मनिष पांडे, भुवनेश्वर कुमार, रिद्धिमान साहा, सिद्धार्थ कौल, दीपक हुडा, खलील अहमद, संदीप शर्मा, युसुफ पठाण, श्रीवत्स गोस्वामी, रिकी भुई, बसिल थम्पी, टी. नटराजन, सचिन बेबी, बिपुल शर्मा, मेहदी हसन, तन्मय अगरवाल, अॅलेक्स हेल्स, कार्लोस ब्रेथवेट, राशिद खान, शाकिब अल हसन, मोहम्मद नाबी आणि ख्रिस जॉर्डन.
कोलकाता नाइट रायडर्स : दिनेश कार्तिक (कर्णधार), सुनिल नेरेन, आंद्रे रसेल, ख्रिस लिन, रॉबिन उथप्पा, कुलदीप यादव, पियूष चावला, नितिश राणा, प्रसिद्ध क्रिष्णा, शिवम मावी, मिचेल जॉन्सन, शुभमान गिल, आर. विनय कुमार, रिंकू सिंग, कॅमेरुन डेलपोर्ट, जेवॉन सीर्लेस, अपूर्व वानखेडे, इशांक जग्गी आणि टॉम कुर्रन.
वेळ : सायंकाळी ७ वा.
ईडन गार्डन, कोलकाता