हैदराबाद :- कोलकाता नाइट रायडर्स संघाने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करत बाद फेरीतील स्थान पक्के केले. त्यांनी गुणतालिकेतील तिसरे स्थान कायम राखले आहे. हैदराबादने दिलेले १७३ धावांचे आव्हान कोलकात्याने ख्रिस लिनच्या अर्धशतकाच्या बळावर १९.४ षटकांत पाच फलंदाजांच्या मोबदल्यात गाठले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने धडाकेबाज सुरुवात केली. अॅलेक्स हेल्सच्या जागी श्रीवत्स गोस्वामीने फटकेबाजी करत २६ चेंडूंत ३५ धावा फटकावल्या. शिखर धवनसोबत त्याने ८.४ षटकांत ७९ धावांची सलामी दिली. धवनने ३९ चेंडूंत पाच चौकार व एका षटकारासह ५० धावा केल्या. कुलदीप यादवने गोस्वामीला बाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर कर्णधार केन विल्यम्सनने ३६ धावा चोपल्या. कृष्णाने शेवटच्या षटकात तीन फलंदाजांना माघारी धाडले.
लक्ष्याचा पाठलाग करत कोलकाताने धडाकेबाज सुरुवात केली. सुनील नरिन व लिनने नेहमीप्रमाणे धडाकेबाज फलंदाजी करत अवघ्या चौथ्या षटकात संघाचे अर्धशतक फलकावर लावले. १० चेंडूंत चार चौकार व दोन षटकारांसह २९ धावा काढणारा नरिन शकिब अल हसनचा शिकार ठरला. मात्र लिनने रॉबिन उथप्पाच्या साथीने फटकेबाजी चालू ठेवत ३६ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. ५५ धावा करून लिन बाद झाला. पुढे कर्णधार दिनेश कार्तिकने जबाबदारीने फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला व दिमाखात बाद फेरी गाठली.
धावसंख्या
सनरायझर्स हैदराबाद : २० षटकांत ९ बाद १७२ (शिखर धवन ५०, केन विल्यम्सन ३६; प्रसिध कृष्णा ४/३०) पराभूत वि.
कोलकाता नाइट रायडर्स : १९.४ षटकांत ५ बाद १७३ धावा ( ख्रिस लिन ५५, रॉबिन उथप्पा ४५; सिद्धार्थ कौल २/२६).