नवी दिल्ली-अभिनेता इरफान खान सध्या दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. दरम्यान इरफान खान स्टारर ‘डूब: नो बेड आॅफ रोझेस’ या चित्रपटाची आॅस्करवारी पक्की झाली आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणा-या ९१ व्या अॅकॅडमी अवॉर्डसाठी अर्थात आॅस्कर पुरस्कारासाठी बांगलादेशकडून इरफान खानच्या ‘डूब: नो बेड आॅफ रोझेस’ या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.
सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपटांच्या श्रेणीत बांगलादेशकडून हा चित्रपट आॅस्करसाठी पाठवला जाणार आहे. खरे तर ‘डूब: नो बेड आॅफ रोझेस’ हा चित्रपट बराच वादग्रस्त ठरला होता. बांगलादेशमध्ये या चित्रपटावर सर्वप्रथम बंदी घालण्यात आली होती. इरफान खानने मध्यवर्ती भूमिका साकारलेल्या या चित्रपटाच्या कथेवरून बांगलादेशमध्ये बरेच रान माजले होते. चित्रपटाच्या कथेवरून वाद निर्माण झाल्याने बांगलादेशात या चित्रपटावर पूर्ण बंदी लादण्यात आली होती. पण कालांतराने ही बंदी उठवण्यात आली आणि नंतर आॅक्टोबर २०१७ मध्ये हा चित्रपट बांगलादेश, फ्रान्स, भारत आणि आॅस्ट्रेलियात प्रदर्शित झाला. मोस्तफा फारूखी हे भारत बांगलादेशची संयुक्त निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.
बांगलादेशी लेखक चित्रपट निर्माते हुमायूं अहमद यांच्या आयुष्यावर हा चित्रपट बेतलेला आहे. पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेतल्यानंतर अहमद यांनी स्वत:पेक्षा ३३ वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीशी लग्नगाठ बांधली होती. इरफान या चित्रपटाचा सहनिर्माताही आहे. बांगलादेशच्या जाझ मल्टिमीडिया, भारताच्या एस्के मूव्हीज आणि इरफान खानच्या आयके कंपनीने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
२००२ पासून बांगलादेश आॅस्करच्या सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपटाच्या शर्यतीत आहे.
भारताकडून आॅस्कर पुरस्कारांच्या सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपटांच्या विभागासाठी ‘विलेज रॉकस्टार’ हा चित्रपट निवडण्यात आला आहे. एकूण २९ चित्रपटांमधून‘विलेज रॉकस्टार’ची निवड करण्यात आली आहे. ‘राजी’, ‘पद्मावत’, ‘हिचकी’, ‘आॅक्टोबर’, ‘लव सोनिया’, ‘गुलाबजाम’,‘ महानटी’, ‘पिह’ू, ‘कडवी हवा’, ‘बोगदा’, ‘रेवा’, ‘बायोस्कोपवाला’, ‘मंटो’, ‘१०२ नॉट आऊट’, ’पॅडमॅन’, ‘भयानकम’, ‘आज्जी’, ‘न्यूड’, ‘गल्ली गुलैया’ या चित्रपटांना मागे टाकत ‘विलेज रॉकस्टार’ने बाजी मारली आहे.