शिंदखेडा शहरांमध्ये अनियमित वीज पुरवठा, वारंवार खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये संताप, वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी.

शिंदखेडा (प्रतिनिधी) शहरामध्ये अनियमित वीज पुरवठा व वारंवार वीज पुरवठा खंडित होणे यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शहरातील वीज पुरवठा नियमित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत शिंदखेडा येथील महावितरणचे कनिष्ठ अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनाचा आशय–शिंदखेडा शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. महावितरण कडून वीज पुरवठा खंडित होण्याची अशी विशिष्ट वेळ नसून कर्मचारी व अधिकाऱ्यांना वाटले त्यावेळेस वीजपुरवठा खंडित केला जातो. वीज पुरवठा खंडित होणार आहे याची कोणतीही पूर्व सूचना नागरिकांना महावितरण कार्यालयाकडून दिली जात नाही. दिवसा तसेच रात्री अपरात्री वीज पुरवठा खंडित होत असल्याने शहरात चोरीचे प्रमाण देखील वाढले आहे. एक महिना जरी वीज बिल भरण्यास उशीर झाल्यास तात्काळ महावितरणचे कर्मचारी संबंधित ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचून विज बिल भरण्याचा आग्रह धरतात. मात्र अशा कर्मचाऱ्यांनी शहरात वीज पुरवठा नियमित ठेवण्याकडे अधिक लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

शहरामध्ये उन्हाची तीव्रता अधिकच वाढली आहे. एकीकडे प्रशासनाकडून उन्हात नागरिकांनी विनाकारण फिरू नये. घरातच राहावे व वाढत्या उन्हाच्या तीव्रतेपासून आपले संरक्षण करावे असे आवाहन करण्यात येते. मात्र वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने घरात बसून देखील वीज नसल्यामुळे उकाड्यापासून नागरिकांचे हाल होत आहेत. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी शहरात वीज पुरवठा सुरळीत न ठेवल्यास नागरिकांकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर शिंदखेडा नगरपंचायतीचे विरोधी पक्ष नेते सुनील चौधरी, दीपक अहिरे,शब्बीर पठान,दिनेश माळी, राजेश मारणे, यांच्या सह्या आहेत.