नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय संचालकपदावर आलोक वर्मा यांची फेरनियुक्ती केल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी निवड समितीने आलोक वर्मा यांची सीबीआय संचालकपदावरुन हकालपट्टी केली. दरम्यान याबाबत आलोक वर्मा यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सीबीआयचा प्रामाणिकपणा नष्ट करण्याचे काम केले जात आहे. सीबीआयची अखंडता नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचे असे आरोप आलोक वर्मा यांनी केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारने आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा घेतलेला निर्णय चुकीचे ठरवत, वर्मा यांना पुन्हा रुजू केले होते. दरम्यान काल त्रिसदस्यीय निवड समितीच्या बैठकीत त्यांना पुन्हा पदावरून हटविण्याचा बहुमताने निर्णय घेण्यात आला. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांच्या हकालपट्टीस विरोध केला होता.
केंद्रीय दक्षता आयोगाच्या (सीव्हीसी) अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून एम. नागेश्वर राव यांच्याकडे पुन्हा सीबीआयची सूत्र सोपविण्यात आली आहेत. वर्मा यांची सीव्हीसीकडून सुरू असलेली चौकशीही कायम राहणार आहे.
निवड समितीत पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि विरोधी पक्षनेते यांचा पदसिद्ध समावेश असतो. सरन्यायाधीश गोगोई यांनीच बुधवारी वर्मा यांना पदावर कायम करण्याचा निर्णय दिल्याने त्यांनी या बैठकीत आपल्याऐवजी न्या. ए. के. सिक्री यांना पाठविले होते. तिसरे सदस्य काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी वर्मा यांची पाठराखण केली.