मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कालमर्यादेत घ्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र हा निर्णय निश्चित कालमर्यादित घेणे अश्यक असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याचा माझा प्रयत्न आहे. मात्र यासाठी कालमर्यादा निश्चित करणे अशक्य आहे. माझ्यासमोर अनेक अर्ज आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे व्हिप कोणत्या राजकीय पक्षाने बजावायचा यावर अद्याप स्पष्टता यायची आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. विधिमंडळ राजकीय पक्षाला मान्यता देण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने विधानसभाध्यक्षांना दिला आहे. मी सर्व पक्षकारांना यासंदर्भात म्हणणे मांडण्याची संधी देईल. सर्वोच्च न्यायालयाकडून आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा विधानसभाध्यक्षांकडे सोपवण्यात आला आहे. मी यापूर्वीच याबाबत वारंवार भूमिका मांडली आहे. आमदारांना अपात्र ठरवण्याची कार्यकक्षा न्यायालय नसून, विधिमंडळाकडे आहे. त्यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. याबाबत सर्वच बाजूंची पडताळणी करण्यात येईल, असं राहूल नार्वेकर म्हणाले.