‘म्हाडा’सह कोणत्याही सरकारी योजनेत दुसरे घर घेणे आता अशक्य!
राज्य सरकारच्या २०१९ च्या आदेशाची कठोर अंमलबजावणी
मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४ हजार ८३ घरांच्या सोडतीसाठी सोमवारपासून अर्ज विक्री – स्वीकृती प्रक्रिया सुरू होत आहे. मात्र यापूर्वी म्हाडाच्या इतर मंडळातील वा सिडकोसह इतर सरकारी योजनेतील घरांचे लाभार्थी या सोडतीच्या माध्यमातून मुंबईत हक्काचे घर घेऊ इच्छिणाऱ्यांचे स्वप्न आता पूर्ण होऊ शकणार नाही. आता म्हाडाचे किंवा इतर कोणत्याही सरकारी योजनेत दुसरे घर घेता येणार नाही. यासंबंधीच्या राज्य सरकारच्या २०१९ च्या आदेशाची कडक अंमलबजावणी म्हाडाने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार म्हाडाच्या नवीन संगणकीय प्रणालीत यासाठीची सुविधा विकसित केली आहे.
विविध सरकारी योजनांतून एकाच वेळी एकापेक्षा अधिक घरांचा लाभ घेणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे समोर आले आहे. या पूर्वी कोकण मंडळाच्या सोडतीतील लाभार्थी असलेली व्यक्ती पुणे मंडळ वा इतर मंडळाच्या सोडतीतही सहभागी होऊन घर घेऊ शकत होती. तर, सिडकोच्या योजनेतील लाभार्थी मुंबई मंडळ, कोकण मंडळ वा म्हाडाच्या इतर मंडळाच्या सोडतीद्वारेही घर घेऊ शकत होते. त्याप्रमाणे अनेकांनी अशी घरे घेतली आहेत. मात्र, आता अशी घरे घेता येणार नाहीत.
म्हाडा वा इतर कोणत्याही सरकारी योजनेतील एका कुटुंबाला एकच घर घेता येईल, यासंबंधीचा शासन निर्णय ११ सप्टेंबर २०१९ रोजी जारी करण्यात आला आहे. या आदेशाची अंमलबजावणी प्रभावीपणे झालेली नाही किंवा आधीच्या लाभार्थ्यांचा शोध घेण्याची कोणतीही यंत्रणा नसल्याने आदेशाची अंमलबजावणी करता येत नव्हती. पण, आता मात्र या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
म्हाडाच्या नव्या संगणकीय प्रणालीत अशा लाभार्थ्यांचा शोध घेण्याची सुविधा विकसित करण्यात आल्याची माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली आहे.