जे. टी. महाजन इंग्लिश मेडीयम स्कूल फैजपूर येथे कृष्ण जयंती उत्साहात साजरी

न्हावी प्रतिनिधी दि 6
कृष्ण जन्माष्टमी हा श्रावण महिन्यातील अष्टमीचा दिवस सर्वांसाठी आनंदाने हर्षभराचा असतो. विद्यालयातील विद्यार्थी बालगोपाल बनून नटून-थटून येतात तसेच युवकांमध्येही दहीहंडी हा आनंदाचा हर्षोल्हास करणारा क्षण असतो.

याच पार्श्वभूमीवर जे. टी. महाजन इंग्लिश मेडीयम स्कूल फैजपूर येथे कृष्ण जयंती व दहीहंडी सह रासक्रीडा कार्यक्रम घेण्यात आला. सुरुवातीला इ.९ वी ची विद्यार्थिनी जिज्ञासा ढाके हिने भगवान श्रीकृष्णांच्या आयुष्यावर प्रकाश टाकत त्यांच्या बालवयातील खोड्यांपासून तर जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण व त्यांचे दशावतार यासंबंधी विशेष माहिती दिली. यानंतर कृष्णजन्म प्रसंगी विद्यालयातील सर्व महिला शिक्षकांनी कृष्ण जन्माचा आनंद द्विगुणित करत भजन प्रस्तुत केले. यानंतर इ. ३री व ४थी च्या विद्यार्थिनींनी गरबा खेळत कृष्णमय वातावरणाची निर्मिती केली. व यानंतर प्रत्यक्ष श्रीकृष्णाच्या रूपात श्रेयस कोंडे(इ.७वी) तर अर्जुनाच्या भूमिकेत हिमांशू वाघुळदे यांनी उत्कृष्ट अभिनय करत कुरुक्षेत्रावरील गीता सार प्रसंग प्रस्तुत केला. पुढे गोप गोपिकांच्या रूपात नटलेल्या इ.७वी व ८वी च्या विद्यार्थिनींनी विद्यालयाच्या प्रार्थना प्रांगणात भव्य रास क्रीडा सादर केली. श्रीकृष्णांच्या रास क्रीडेतील विविध लीला प्रसंग यात दर्शविण्यात आले. तर यानंतर पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक गटासाठी दहीहंड्यांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपापल्या दहीहंडीचा आनंद घेत मोठ्या उत्साहात दहीहंडी फोडली. संपूर्ण कृष्णमय वातावरणात विद्यार्थ्यांनी संगीत तालावर ठेका घेत , उत्कृष्ट घेर, फुगड्या व बालगोपालांचे नृत्य असा विहंगम कार्यक्रम रंगवला.
कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य मोझेस जाधव, पर्यवेक्षिका पुनम नेहेते, विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक अतुल गोराडकर यांनी केले.